दोनच वर्षापूर्वी प्रचंड मोठा विजय, आता स्वतःच्याच पक्षातून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, यूकेत काय सुरू?

किअर स्टार्मर

फोटो स्रोत, PA Media

    • Author, ओटिली मिशेल
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

यूकेचे पंतप्रधान सर किअर स्टार्मर यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांच्याच खासदारांकडून होते आहे. या मागणीत वाढ होते आहे. मात्र दुसऱ्या बाजूला किअर स्टार्मर यांनी ते 'सरकार चालवत राहतील' असं म्हटलं आहे.

ज्या व्यक्तीनं 2 वर्षांपूर्वी निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर लोकांमध्ये अप्रिय ठरलेल्या धोरणांवरून अनेक वेळा यू-टर्न घेतले आणि अनेक घोटाळ्यांना सामोरं गेला, अशा व्यक्तीसाठी हा नाट्यमय बदल आहे.

संपूर्ण इंग्लंडमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत लेबर पार्टीच्या जवळपास 1500 नगरसेवकांचा पराभव झाला. त्यानंतर वाढत्या असंतोषाचं चिन्ह म्हणून सरकारमधील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत.

माजी उपपंतप्रधान अँजेला रेनर, माजी आरोग्य सचिव वेस स्ट्रीटिंग आणि ग्रेटर मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम हे यूकेचं नेतृत्व करण्यासाठीचे म्हणजे पंतप्रधानपदाचे संभाव्य दावेदार मानले जात आहेत.

ही परिस्थिती का निर्माण झाली?

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांच्या एका फेरीनंतर सध्याचं हे नेतृत्वाचं संकट निर्माण झालं.

अर्थात काही काळापासून सर किअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी किंवा असंतोष वाढतच होता.

गेल्या वर्षी, किअर स्टार्मर यांच्या सरकारनं एकाच महिन्यात 3 प्रमुख धोरणं बदलली होती. त्यांच्या स्वत:च्याच पक्षात अंतर्गत दबाव निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

तर या वर्षाच्या सुरुवातीला असं उघड झालं की, लॉर्ड मँडेलसन यांची राजदूत म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी पडताळणी किंवा छाननी झाली असता त्यात ते अपात्र ठरले होते. मात्र तरीदेखील त्यांची अमेरिकेतील ब्रिटिश राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती.

ग्राफिक्स

दोषी ठरलेला लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्यासोबत लॉर्ड मँडेलसन यांचे संबंध असल्याचं समोर आल्यानंतर किअर स्टार्मर यांच्या निर्णयक्षमतेबद्दल लोक आधीच प्रश्न उपस्थित करत होते किंवा त्याबद्दल शंका उपस्थित करत होते.

त्यातून स्थानिक निवडणुकीत लेबर पार्टीला मोठा फटका बसण्याची पार्श्वभूमी तयार झाली.

त्यातच रिफॉर्म यूके या नायजेल फराज यांच्या पक्षाला आणि डाव्या विचारसरणीच्या ग्रीन पार्टीला मिळत असलेल्या मोठ्या पाठिंब्यामुळे लेबर पार्टीला बसलेल्या या फटक्यात आणखी भर पडली. रिफॉर्म यूके ही पारंपारिक विरोधी पक्षाला आव्हान देणारी एक नवीन राजकीय शक्ती आहे.

कॅथरिन वेस्ट या लेबर पार्टीच्या एक खासदार आहेत. लेबर पार्टीचा पराभव होत असताना कॅथरिन यांनी जाहीर केलं की, जर सोमवारपर्यंत (18 मे) एखाद्या दुसऱ्या उमेदवारानं किअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं नाही, तर त्या स्टार्मर यांच्या नेतृत्वाला आव्हान देतील.

त्यानंतर, कॅथरिन वेस्ट यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र जवळपास 90 खासदारांनी किअर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांच्या राजीनाम्याबाबत एक वेळापत्रक जाहीर करावं, अशी मागणी केली आहे.

किअर स्टार्मर यांना नेतृत्वासाठी कोण आव्हान देऊ शकेल?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अँजेला रेनर

रेनर या मँचेस्टरच्या सर्वात गरीब भागांपैकी एका भागात वाढलेल्या आहेत. त्यांना लेबर पार्टीतील डाव्या विचारसरणीच्या काही लोकांचा पाठिंबा आहे.

त्या स्वत:ला 'खऱ्याखुऱ्या कामगार वर्गा'तील महिला म्हणवतात. गेल्या सप्टेंबरपर्यंत त्या सर किअर स्टार्मर यांच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान होत्या. एका अपार्टमेंटसंदर्भात त्यांनी पुरेसा कर न भरल्यामुळे ब्रिटिश कर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

मात्र गुरुवारी (14 मे) त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. 'जाणूनबुजून कर चुकवल्याच्या' आरोपातून त्यांची 'निर्दोष मुक्तता' झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

हा तपास त्यांच्या नेतृत्वाच्या मार्गातील अडथळा मानला जात होता. मात्र या प्रकरणावर पडदा पडल्यामुळे पंतप्रधानपदाच्या संभाव्य शर्यतीमध्ये त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करणं, इतरांना सहज पोहोचता येणार नाही अशा मतदारांशी जोडलं जाण्याची क्षमता, या त्यांच्या क्षमतांमुळे त्या लेबर पार्टीतील नेतृत्वासाठीच्या स्पर्धेत एक प्रबळ दावेदार ठरू शकतात.

वेस स्ट्रीटिंग, अँजेला रेनर आणि अँडी बर्नहॅम यांच्याकडे किअर स्टार्मर यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जात आहे

फोटो स्रोत, Getty/ Belinda Jiao/ The Telegraph

फोटो कॅप्शन, वेस स्ट्रीटिंग, अँजेला रेनर आणि अँडी बर्नहॅम यांच्याकडे किअर स्टार्मर यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जात आहे

अँडी बर्नहॅम

अँडी बर्नहॅम ग्रेटर मँचेस्टरचे महापौर आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना 'किंग ऑफ नॉर्थ' असं म्हटलं जातं. लेबर पार्टीच्या नेतृत्वासाठी त्यांनी दोनदा निवडणूक लढवली आहे आणि त्यात त्यांचा पराभव झाला आहे.

मात्र महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर ते तीनवेळा निवडून आले आहेत. या प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत त्यांनी केलेल्या बदलाबद्दल आणि कोरोनाच्या काळात उत्तर इंग्लंडचा बचाव केल्याबद्दल त्यांचं कौतुक झालं आहे.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येण्यासाठी त्यांना खासदार होणं आवश्यक आहे. यावर्षाच्या सुरुवातीला लेबर पार्टीच्या निर्णय घेणाऱ्या समितीनं त्यांना तसं करण्यापासून रोखलं होतं.

मात्र आता, एका खासदारानं म्हटलं आहे की, बर्नहॅम यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी तो त्याची खासदारकी सोडणार आहे. यामुळे संसदेतील या जागेसाठी स्पर्धा निर्माण होईल.

सरकारनं ते बर्नहॅम यांना लेबर पार्टीचे उमेदवार होण्यापासून रोखणार नाहीत, असे संकेत दिले आहेत. मात्र रिफॉर्म यूके आणि ग्रीन पार्टीच्या वाढत्या प्रभावामुळे किंवा त्यांना मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्यामुळे कदाचित ते ही जागा जिंकू शकणार नाहीत.

बर्नहॅम म्हणाले आहेत की, संपूर्ण यूकेमधील 'लोकांसाठी राजकारण योग्यप्रकारे चालवलं जाईल' या आश्वासनावर ते या जागेवर निवडणूक लढवतील.

ग्राफिक्स

वेस स्ट्रीटिंग

वेस यांचा जन्म 1983 साली पूर्व लंडनमध्ये किशोवयीन आई-वडिलांच्या पोटी झाला. त्यांचं बालपण गरिबीत गेलं.

ते काही काळापासून नेतृत्वासाठीच्या शर्यतीसाठी शांतपणे तयारी करत आहेत. इतकंच नाही तर, त्यांनी एक वेगळं पाऊल उचलत, त्यांची लॉर्ड मँडेलसन यांच्याशी झालेली खासगी संदेशांची देवाणघेवाण देखील प्रसिद्ध केली. असं करताना वेस यांनी ते मँडेलसन यांचे कधीही जवळचे मित्र नव्हते यावर भर दिला.

आरोग्य सचिव म्हणून आरोग्य सेवेत मोठे बदल घडवून आणण्याच्या आणि रुग्णांना अधिक देण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे त्यांचं कौतुक झालं.

अगदी राजकीय विरोधकांनीही त्यांचं कौतुक केलं. मात्र त्याचबरोबर डॉक्टरांच्या पगारावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर टीकादेखील झाली.

गुरुवारी (14 मे) त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. यासाठी त्यांनी पंतप्रधानाच्या नेतृत्वावरील विश्वास गमावल्याचं कारण दिलं.

त्यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटलं आहे की, लेबर पार्टीला दूरदृष्टीची आवश्यकता होती. मात्र त्याऐवजी "आपल्यासमोर एक पोकळी निर्माण झाली आहे."

अर्थात, त्यांनी किअर स्टार्मर यांना आव्हान देत असल्याचं जाहीर केलेलं नसलं तरीदेखील ते लवकरच तसं करू शकतात, असं त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या पाठिराख्यांना वाटतं की, किअर स्टार्मर यांच्या तुलनेत लेबर पार्टीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय कौशल्यं आणि ओघवती शैली त्यांच्याकडे आहे.

मात्र ते पक्षातील उजवीकडचे नेते असल्याने डावीकडे अधिक झुकणाऱ्या सहकाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागू शकतो.

किअर स्टार्मर राजीनामा देतील का?

किअर स्टार्मर यांच्या विरोधात आवाज वाढत असला तरी ते पदाचा राजीनामा देतील याची खात्री नाही.

किंबहुना, त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला सांगितलं आहे की, ते 'सरकारचं कामकाज पुढे सुरू ठेवतील' आणि नेतृत्वाच्या स्पर्धेमुळे 'गोंधळाची स्थिती' निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लेबर पार्टीमध्ये नेत्याला आव्हान देण्याची एक औपचारिक प्रक्रिया आहे आणि "ती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही" यावरही किअर स्टार्मर यांनी जोर दिला आहे.

अशाप्रकारे नेतृत्वाला आव्हान देऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला 81 खासदारांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे.

 किअर स्टार्मर

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, किअर स्टार्मर

सरकारनं म्हटलं आहे की, किअर स्टार्मर त्यांच्या नेतृत्वाविरोधात उभ्या ठाकलेल्या कोणत्याही आव्हानाचा ते सामना करतील.

या पार्श्वभूमीवर 150 हून अधिक खासदारांनी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे किंवा त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची ही योग्य वेळ नाही, असं म्हटलं आहे.

आता पुढे काय होणार?

लेबर पार्टीच्या नियमांनुसार, पदावर असलेल्या नेत्याला आव्हान देण्यासाठी एका उमेदवाराला पक्षाच्या 20 टक्के खासदारांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे.

संसदेत लेबर पार्टीचे 403 खासदार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांना आव्हान देणाऱ्या उमेदवाराला 81 खासदारांचा पाठिंबा आवश्यक असेल.

एकदा का ही प्रक्रिया सुरू झाली की, 81 खासदारांचा पाठिंबा असलेले इतर उमेदवारदेखील त्यात सहभागी होऊ शकतात.

त्यानंतर पक्षाचे सदस्य त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करतील.

ग्राफिक्स

जर किअर स्टार्मर यांना जुलैपूर्वी पदावरून हटवण्यात आलं, तर त्यांच्या जागी येणारे नवीन पंतप्रधान गेल्या 10 वर्षांमधील यूकेचे 7 वे पंतप्रधान असतील.

जोपर्यंत ही प्रक्रिया सुरू होत नाही, तोपर्यंत किअर स्टार्मर हेच पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील. पुढील सार्वत्रिक निवडणूक 15 ऑगस्ट 2029 किंवा त्यापूर्वी होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)