जिवंत असताना 'त्यानं' हजारो जणांचं, तर मृत्यूनंतर 8 जणांचं आयुष्य वाचवलं

- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
काही लोक उभ्या आयुष्यात जेवढा इतिहास रचतात, त्याहून काकणभर जास्त इतिहास मृत्यूनंतरही रचतात. 27 वर्षांचा अनुजित याच लोकांमध्ये मोडणारा एकजण होता.
कोरोनाच्या संकटात आपली नोकरी गमावल्यानंतर अनुजित नव्या नोकरीच्या शोधात होता. मात्र, याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
केरळमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या घटनेनंतर अनुजितला ब्रेन-डेड घोषित करण्यात आलं. सेल्समनच्या नोकरीसाठी अनुजित केरळला जात होता.
अनुजितला अवयवदान करण्याची इच्छा होती. त्याच्या कुटुंबानं त्याची ही इच्छा पूर्ण केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दोन कॉर्निया, हृदय, दोन किडन्या, छोट्या आतड्या आणि हात इत्यादी अवयव दान केले जाणार आहेत. अनुजितच्या या अवयवांमुळे आठ लोकांना नवं आयुष्य मिळणार आहे.
ज्या लोकांना अनुजितचे अवयव दान करण्यात आलेत, त्यातील तिघेजण कोचीमधील आहेत.
17 वर्षांचा असताना हजारोंचे जीव वाचवले होते...
अनुजितच्या आयुष्यात अशी एक घटना घडून गेली, ज्यात अनुजितमुळे हजारो लोकांचं आयुष्य वाचलं. 10 वर्षांपूर्वी अनुजितमुळे रेल्वेची दुर्घटना होता होता टळली. अनुजितच्या या सतर्कतेमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.
रेल्वे दुर्घटना होण्यापासून रोखण्यासाठी अनुजित रेल्वे रुळावर धावून पुस्तकांची लाल रंगाची बॅग दाखवली होती.
रेल्वेची ही घटना घडली, त्यावेळी (1 सप्टेंबर 2010) अनुजित केवळ 17 वर्षांचा होता. एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनुजित शिकत होता.

फोटो स्रोत, ROBERTHYRONS
अनुजित आणि त्याच्या मित्रांनी कोट्टारक्करा (केरळ) जवळ रेल्वे रुळावर क्रॅक पाहिला. त्यावेळी अनुजितने आपल्या जीवाची पर्वा न करताच, लाल रंगाची बॅग फडकवत तो रुळावर धावत सुटला होता.
केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा म्हणतात, "मला ज्या ज्या वेळी अनुजितचा चेहरा आठतो, त्या त्या वेळी मला हेच आठवतं की, त्यानं हजारो लोकांचा जीव वाचवला आणि मृत्यूनंतरही आठ जणांना नवं आयुष्य दिलं."
अनुजितचे हात, छोट्या आतड्या आणि हृदय कोचीच्या रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी हेलिकॉप्टरनं नेण्यात आलं. त्याच्या शरीराचे इतर अवयव केरळ इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (KIMS) मधील रुग्णांना दान करण्यात आले.
अनुजितचे अवयव तातडीने हेलिकॉप्टरद्वारे आवश्यक ठिकाणी पोहोचवण्याचे आदेश स्वत: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिले.
केल्विन जॉय... आणखी एक हिरो..
अनुजितसोबत एर्नाकुलममधील 39 वर्षीय केल्विन जॉय यांनीही आठ लोकांना जीवदान दिलंय.
ब्रेन हॅमरेजमुळे शनिवारी केल्विन हे जग सोडून गेले. मात्र, कुटुंबानं त्यांच्या दोन कॉर्निया, हृदय, दोन किडन्या, छोट्या आतड्या, दोन हात आणि यकृत दान करण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
केरळ सरकारच्या अवयवदान योजनेचे नोडल अधिकारी डॉ. नोबेल ग्रेसियस यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "दोन ब्रेन डेड व्यक्तींच्या आठ-आठ म्हणजे 16 अवयवयांमुळे तितक्याच म्हणजे 16 जणांना नवं आयुष्य मिळालं. हे केरळसह भारतात पहिल्यांदाच घडलं आहे. याआधी आम्ही एका ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवांमुळे पाच लोकांना अवयवांची मदत केली होती. एका ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवांमुळे जास्तीत जास्त सहा लोकांना मदत केली जाऊ शकते."
ज्या लोकांना अनुजित आणि केल्विन जॉय यांचे अवयव दान करण्यात आले, त्यांची नावं डॉ. ग्रेसियस यांनी सांगितली नाहीत.
"अवयव प्रत्यारोपणाच्या दहा दिवसांनंतर हे पाहावं लागेल की, हे अवयव प्रतिदास देत आहेत की नाही. त्यामुळे आम्ही आताच त्यांची नावं जाहीर करू शकत नाही. पुढच्या आठवड्यानंतरही त्यांच्या कुटुंबीयांची परवानगी घ्यावीच लागेल," असं डॉ. ग्रेसियस म्हणाले.
भारतात अवयवदान करण्यास अनेकजण तयार होत नाहीत. यात अजून मोठ्या प्रमाणात प्रबोधनाची गरज आहे. 2018 सालच्या आकडेवारीनुसार, देशात अवयवदानाचा दर खूपच कमी आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)





















