42 नवरदेव मंडपात पोहोचले, पण त्यांच्या वधूच गायब; सामूहिक विवाह सोहळ्यात नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, SAMEER KHAN
- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Author, समीर खान
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
देवासच्या माता टेकरी मंदिरात रविवारी (24 मे) सकाळी काही तरुण लग्नातील हळदी आणि इतर विधी सुरू होण्याची वाट पाहत उभे होते. काहींच्या गळ्यात फुलांचे हार होते, काही नातेवाईकांसोबत आले होते, तर अनेकजण भाड्याच्या कारमधून वऱ्हाड घेऊन येथे आले होते.
पुढील 24 तासांत त्यांचं लग्न होईल, असं त्यांना सांगण्यात आलं होतं.
रात्र झाली तरी ना तिथे वधू आल्या ना कोणाचं लग्न झालं.
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातून समोर आलेल्या या सामूहिक विवाह फसवणूक प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघा संशयित आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
"लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे उकळण्यात आले. या प्रकरणात आम्ही आतापर्यंत दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे," असं देवासचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयवीरसिंह भदौरिया यांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न लावून देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांकडून पैसे घेण्यात आले होते. त्यांना इंदूरमधील एका अनाथाश्रमातील मुलींशी लग्न लावून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.
फसवणुकीचं हे नेटवर्क कसं चालत होतं?
पोलीस आणि फसवणूक झालेल्या लोकांनी (पीडित) हे संपूर्ण नेटवर्क कशा पद्धतीने काम करत होतं हे सांगितलं. आधी लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या तरुणांशी संपर्क साधला जायचा. त्यांना इंदूरमधील एका आश्रमात राहणाऱ्या मुली लग्नासाठी तयार असल्याचं सांगितलं जायचं.
यानंतर तरुणांकडून नोंदणीच्या नावाखाली पैसे घेतले जात असत आणि त्यांच्याकडून ऑनलाइन कागदपत्रंही जमा करून घेतली जात होती.
या प्रकरणातही वर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोबाइलवर मुलींचे फोटो पाठवण्यात आले होते. नंतर काही फसवणूक झालेल्या लोकांनी हे फोटो सोशल मीडियावरून घेतल्याचा दावा केला आहे.
लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचंही नाव घेण्यात आल्याचा काही तक्रारदारांचा आरोप आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका तक्रारदाराने बीबीसी हिंदीला सांगितलं की, "मुली चांगल्या आहेत, लग्न होईल अशी स्वप्नं आम्हाला दाखवण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री स्वतः येतील आणि 51 हजार रुपयांचा धनादेशही (चेक) देतील असं सांगितलं होतं."
ही लग्न जुळवणारी टोळी तक्रार करणाऱ्या तरुणापर्यंत त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाच्या माध्यमातून पोहोचली होती.
ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं गेलं, सामूहिक लग्नाची चर्चा झाली आणि मुलींचे फोटोही दाखवले गेले. त्यामुळे आमची खात्री पटली."
या 22 वर्षीय तरुणाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याने लग्नाआधी मुलींना भेटण्याबद्दल विचारलं, तेव्हा त्याला मुली अनाथाश्रमातील आहेत, त्यामुळे आधी भेटणं शक्य नाही, असं सांगितलं.
तो म्हणाला, "आम्हाला सांगण्यात आलं होतं की 24 तारखेला मुलं आणि मुलींची भेट करून देण्यात येईल. बोलण्याची पूर्ण संधी दिली जाईल आणि नंतर 25 मे रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावलं जाईल."
लग्नात हुंड्याचं सामान दिलं जाईल, असंही आश्वासन काही कुटुंबांना देण्यात आलं होतं.
काही लोकांना लग्नाआधी हळद आणि मेहंदी यांसारख्या विधी करू नयेत, असं सांगण्यात आलं. कारण संपूर्ण विवाह प्रक्रिया देवासमध्येच पूर्ण केली जाणार होती.
वर आले, पण वधू गायब
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ते 9 जणांसोबत वऱ्हाड घेऊन देवासला आले होते.
त्यांनी सांगितलं, "आम्हाला माता टेकरी मंदिरात बोलावलं होतं. 24 तारखेला सकाळी 8 वाजता यायचं आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं."
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना धरून किमान 42 वर तिथे आले होते.
ते म्हणाले की, "बहुतेकांचे वय सुमारे 40 वर्षांच्या आसपास होते. काही 60 वर्षांचे वरही होते. तेव्हा आम्हाला थोडा संशय आला."

फोटो स्रोत, SAMEER KHAN
देवासच्या हरनियाकलां गावातून विकास मीणा आले होते. त्यांनाही लग्नाचे आश्वासन देऊन येथे बोलावण्यात आलं होतं. या लग्नासाठी विकास यांनी 25 हजार रुपये दिले होते.
त्यांनी सांगितलं की, "आमच्याकडून नोंदणीच्या नावाखाली पैसे घेतले गेले होते. इंदूरमधील एका अनाथाश्रमातील मुलींशी लग्न लावून देऊ असं सांगण्यात आलं. आम्ही फोटो मागितले तेव्हा मोबाइलवर मुलींचे फोटो पाठवण्यात आले. नंतर समजलं की ते सर्व फोटो सोशल मीडियावरून घेतलेले होते."
विकास यांच्या म्हणण्यानुसार, आयोजकांनी त्यांना 24 मे रोजी देवासला यायला सांगितलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सामुदायिक विवाह होणार असल्याची माहिती दिली होती.
लग्नाच्या या जाळ्यात लोक इतके फसले की, राजधानी भोपाळपासून 150 किलोमीटर दूर देवासला आले. असेच एक वर ओमप्रकाश प्रजापती यांनी सांगितलं की, त्यांनी मोबाइलवर पाठवलेल्या फोटोंमधून वधू निवडली होती.
त्यांनी सांगितलं, "देवासच्या माता टेकरीवर लग्न होणार आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आम्ही कुटुंबासोबत येथे आलो होतो."
ओमप्रकाश यांनी त्यांच्याकडून 12 हजार रुपये घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले, "आम्हाला साध्या कपड्यांत येण्यास सांगितलं. वराचे कपडे आणि बाकी सर्व विधी इथेच होतील. अगदी हळद आणि मेहंदीही आधी लावायची नाही असं निक्षूनही सांगण्यात आलं होतं."
लग्नाच्या आशेने कुटुंबांनी रात्रभर पाहिली वाट
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रविवारी सकाळी सुमारे 8 वाजता ते कार्यक्रमस्थळी पोहोचले. तेव्हा तिथे आयोजनाची जबाबदारी सांभाळणारे मुकेश बैरागी आणि त्यांची पत्नी सुनीता त्यांना भेटले.
मुकेश बैरागी आणि सुनीता यांनीच यातील अनेक वरांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क साधला होता. याच दोघांनी लग्नासाठी नोंदणी करून घेतली आणि त्यासाठी पैसेही घेतले होते.
वधू इंदूरहून निघाल्या आहेत आणि थोड्याच वेळात ते पोहोचतील, असं रविवारी सकाळी मुकेश आणि त्याची पत्नी सुनीता कुटुंबीयांना सतत सांगत होते.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर वेगवेगळी कारणं सांगितली जात होती. कधी सांगितलं की गाड्या वाटेत आहेत, तर कधी म्हटलं की उर्वरित लोक अजून येत आहेत.
पण रात्रीपर्यंत तिथे कोणीही आलं नाही. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
राजकुमारी नावाची एक महिला, जी आपला भाऊ रोहितचं लग्न लावण्यासाठी तिथे आली होती, ती म्हणते, "आम्ही ऑनलाइन कागदपत्रं जमा केली होती. तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की, एक मॅडम येणार आहेत. परंतु, रात्री 12 वाजेपर्यंत कोणीही आलं नाही."
पण रविवारी सायंकाळी वर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फसवणुकीचा संशय व्यक्त करून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर मुकेशनेही या संपूर्ण प्रकरणात माझीही फसवणूक झाली असल्याचे म्हटले.
मुकेश म्हणाला की, "दिनेश बैरागी हा माझा मोठा भाऊ आहे. त्याने आम्हाला अनाथाश्रमातील मुलींची लग्नं लावायची असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही लोकांना भेटून, त्यांच्याकडून पैसे घेतले. माझ्याकडे जे पैसे यायचे ते मी त्याच्याकडे पाठवायचो. माझीही फसवणूक झाली आहे."
तर राजकुमारीने म्हटलं की,"या घटनेमुळे समाजात आमची बदनामी झाली आहे, लोक आता आमच्यावर हसत आहेत."
चार जणांविरुद्ध FIR, दोघांना अटक
देवासचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयवीरसिंह भदौरिया यांनी पत्रकारांना सांगितलं की, "आम्हाला माहिती मिळाली होती की, काही लोक लग्न लावण्याच्या नावाखाली एकत्र आले आहेत आणि तिथे फसवणुकीचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन लोकांशी चर्चा केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे फसवणूक आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुकेश बैरागी, सुनीता बैरागी, दिनेश बैरागी आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, "प्राथमिक तपासात समोर आलं आहे की लोकांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले गेले. फोटो दाखवून आणि आश्वासन देऊन त्यांना बोलावण्यात आलं होतं. मुख्य आरोपी मुकेशला अटक करण्यात आली आहे आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे."
ते म्हणाले की, "मुकेशने आतापर्यंत सांगितलं आहे की, त्याचा मोठा भाऊ दिनेश बैरागी हे सर्व करत होता. दिनेश बैरागीनेच वर पक्षातील लोकांचे फोन नंबर दिले होते आणि तोच संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी होता."
22 वर्षीय तक्रारदार इतर वरांप्रमाणेच या घटनेनंतर आपल्या घरी परतला आहे. तो म्हणतो, "ज्यांना याची माहिती आहे त्यांना मी हात जोडून ही गोष्ट बाहेर न सांगण्याची विनंती केली आहे. जर कुठे ही माहिती बाहेर पडली तर माझं पुढचं आयुष्य खूप कठीण होईल."
तो पुढे म्हणतो, "पण मी या लोकांना असंच सोडणार नाही. मी तक्रार दाखल केली आहे आणि त्यांना शिक्षा मिळावी म्हणून मी कायदेशीर लढाईही लढणार आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























