वयाच्या 35 वर्षांनंतर गर्भधारणा झाल्यावर डॉक्टर महिलांना 'ही' खास टेस्ट का सुचवतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, चरणजीत कौर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
बॉलिवूड अभिनेत्री कॅतरिना कैफ, दीपिका पादुकोण किंवा फराह खान असोत अथवा अमेरिकन अभिनेत्री हॅले बेरी, अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे वयाच्या चाळीशीत महिलांनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे.
आजच्या काळात अनेक महिला वयाच्या 40 व्या वर्षी किंवा त्यानंतरही आई होण्याचा निर्णय घेत आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री तनाझ इराणी यांनी वयाच्या तिशीत आणि चाळीशीत मूल होण्याशी संबंधित धोक्यांविषयी सांगितलं होतं.
एका पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, "माझं दुसरं मूल वयाच्या 40व्या वर्षी झालं होतं, तेव्हा मला ॲम्निओसेंटेसिस ही तपासणी करावी लागली होती."
बाळाला डाऊन सिंड्रोम किंवा मणक्याशी संबंधित कोणतीही समस्या आहे का, हे समजावे, म्हणून ही टेस्ट किंवा चाचणी केली जाते. कारण वयाच्या 40 वर्षांनंतरच्या गर्भधारणेत असे धोके सामान्यपेक्षा जास्त असतात.
इराणी यांनी उल्लेख केलेली ॲम्निओसेंटेसिस ही चाचणी नेमकी काय आहे? ती कधी आणि कशी केली जाते? या चाचणीचे गर्भवती महिलेवर काही दुष्परिणाम होतात का? तसेच ही चाचणी करताना कोणते नियम पाळावे लागतात? याबद्दल जाणून घेऊया.
डाऊन सिंड्रोम आणि इतर अनुवंशिक आजार ओळखण्यासाठी इतर काही चाचण्या उपलब्ध आहेत का? या आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञांशी संवाद साधला.
ॲम्निओसेंटेसिस चाचणी म्हणजे नेमकं काय?
ॲम्निओसेंटेसिस ही गर्भधारणेदरम्यान केली जाणारी एक चाचणी आहे. या चाचणीमुळे गर्भातील बाळाला काही अनुवंशिक आजार किंवा इतर आरोग्याशी संबंधित समस्या आहेत का, हे समजू शकते. अनुवंशिक आजार म्हणजे आई-वडिलांकडून मुलांमध्ये येणाऱ्या काही वैद्यकीय स्थिती किंवा आजार.
अल्ट्रासाऊंड इमेजिंगच्या मदतीने एक बारीक सुई गर्भाशयात (पोटात) घातली जाते. या सुईद्वारे गर्भातील द्रवाचा (ॲम्निओटिक फ्लुइड) नमुना घेतला जातो आणि तो तपासणीसाठी पाठवला जातो.

फोटो स्रोत, Tannaz irani/FB
लुधियाना येथील सीएमसी हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. तपस्या धर सांगतात, "ॲम्निओसेंटेसिस तपासणीत गर्भातील बाळाच्या आसपास असलेल्या द्रवाचा नमुना एका बारीक सुईच्या मदतीने घेतला जातो."
"अल्ट्रासाऊंडच्या मदतीने अत्यंत काळजीपूर्वक अशा ठिकाणाहून थोडा द्रव घेतला जातो, ज्यातून बाळाच्या कोणत्याही अवयवाला इजा होण्याचा धोका नसतो. या द्रवामध्ये काही पेशी (सेल्स) असतात. त्यांची अनुवंशिक आणि गुणसूत्रांशी (क्रोमोसोम्स) संबंधित तपासणी केली जाते."
"त्यामुळे बाळामध्ये कोणता अनुवंशिक किंवा गुणसूत्रांशी संबंधित विकार आहे का, हे समजू शकतं. त्यानंतर हा नमुना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो."
"ॲम्निओसेंटेसिस ही चाचणी साधारणपणे गर्भधारणेच्या 15 ते 20 आठवड्यांच्या दरम्यान केली जाते. याआधीही अशी तपासणी करता येते. मात्र, गर्भधारणेच्या 11 ते 13 आठवड्यांदरम्यान केल्या जाणाऱ्या तपासणीला 'कोरिओनिक विलस सॅम्पलिंग' (सीव्हीएस) म्हटलं जातं."
ॲम्निओसेंटेसिस चाचणी का केली जाते?
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थेच्या (एनएचएस) वेबसाइटनुसार, ॲम्निओसेंटेसिस ही चाचणी गर्भातील बाळाला डाऊन सिंड्रोम, एडवर्ड्स सिंड्रोम, सिस्टिक फायब्रोसिस यांसारखे कोणतेही अनुवंशिक विकार आहेत का, हे जाणून घेण्यासाठी केली जाते.
डाऊन सिंड्रोम ही एक अनुवंशिक स्थिती आहे, ज्यामुळे बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक म्हणजे मानसिक विकास सामान्यपेक्षा मंद गतीने होऊ शकतो.
एडवर्ड्स सिंड्रोम हा एक दुर्मीळ अनुवंशिक आजार आहे. यावर कोणताही उपचार उपलब्ध नाही आणि या विकाराने ग्रस्त अनेक मुलांचं आयुष्य तुलनेनं कमी असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. तपस्या यांनी सांगितलं की, अनुवंशिक विकारांव्यतिरिक्त थॅलेसेमिया, बाळाच्या मणक्याशी संबंधित काही समस्या, मस्क्युलर डिस्ट्रॉफी (ही एक दुर्मीळ स्थिती आहे, ज्यात स्नायू हळूहळू कमकुवत होत जातात) तसेच काही रक्ताशी संबंधित विकार आहेत का, हे जाणून घेण्यासाठीही ही चाचणी केली जाते.
डॉ. तपस्या सांगतात, "या चाचणीमुळे बाळाच्या गुणसूत्रांमध्ये (क्रोमोझोम) काही दोष आहे का, हे समजू शकतं. उदाहरणार्थ, डाऊन सिंड्रोममध्ये 21व्या गुणसूत्राशी संबंधित बदल किंवा दोष आढळतो. वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या गुणसूत्रांमध्ये बदल दिसू शकतात. जर चाचणीचा अहवाल सामान्य आला, तर बाळ निरोगी असण्याची शक्यता 99 टक्के असते."
त्या पुढे म्हणाल्या, "जर जनुकांमध्ये (जीन्समध्ये) काही बदल किंवा गंभीर समस्या आढळण्याची शक्यता असेल, तर त्यासाठी आणखी प्रगत चाचण्या केल्या जाऊ शकतात."
तिशी-चाळीशीनंतरच्या गर्भधारणेत ही चाचणी का महत्त्वाची ठरते?
गर्भातील बाळाला आरोग्य आणि विकासावर परिणाम करणाऱ्या काही आजारांचा धोका जास्त असल्याची शक्यता असेल, तर गर्भवती महिलेला ॲम्निओसेंटेसिस तपासणी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
एनएचएसच्या माहितीनुसार, गर्भधारणेदरम्यान केलेल्या स्क्रीनिंग चाचण्यांमध्ये बाळाला काही अनुवंशिक विकार असण्याची शक्यता दिसल्यास ॲम्निओसेंटेसिस तपासणीचा सल्ला दिला जाऊ शकतो.
तसेच बाळाचे वडील किंवा जवळच्या एखाद्या नातेवाईकांमध्ये अशा प्रकारचा अनुवंशिक आजार असल्यासही ही तपासणी करण्याची शिफारस केली जाते.
याशिवाय, डॉक्टरांच्या मते जास्त वयात गर्भधारणा झाल्यास अशा प्रकारच्या तपासण्यांची आवश्यकता अधिक भासू शकते.
डॉ. तपस्या सांगतात, "हल्ली अनेक महिला वयाच्या 35 वर्षांनंतर गर्भधारणा करतात. काही महिला आयव्हीएफच्या मदतीने 40 वर्षांच्या आसपास किंवा त्यानंतरही गर्भवती होतात."
"वाढत्या वयात गर्भातील बाळाला डाऊन सिंड्रोमसारख्या अनुवंशिक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे अशा परिस्थितीत ही चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो."
ते पुढे म्हणतात, "आम्ही आधी अल्ट्रासाऊंड तपासणी करतो. त्यात बाळाला अनुवंशिक आजार असण्याची शक्यता दिसल्यास आणखी एक स्क्रीनिंग चाचणी करतो. त्या चाचणीतही काही समस्या आढळली तरच ॲम्निओसेंटेसिस केली जाते. आधीच्या सर्व तपासण्यांचे अहवाल सामान्य असतील, तर या चाचणीची गरज भासत नाही."
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. युक्ता शर्मा यांच्या मते, ही चाचणी प्रत्येक गरोदर महिलेला करण्याचा सल्ला दिला जात नाही. त्याआधी अनेक तपासण्या केल्या जातात. उदाहरणार्थ, 'ड्युअल मार्कर टेस्ट' आणि 11 ते 13 आठवड्यांदरम्यान केली जाणारी 'लेव्हल-1 अल्ट्रासाऊंड' चाचणी (ज्याला एनटी स्कॅन असेही म्हणतात).
ड्युअल मार्कर टेस्ट ही गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत केली जाणारी रक्त तपासणी (ब्लड स्क्रीनिंग) आहे.
त्या पुढे सांगतात, "या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये काही संशयास्पद किंवा असामान्य निष्कर्ष आढळल्यास आम्ही एनआयपीटी (नॉन-इनव्हेसिव्ह प्रीनेटल टेस्ट) करण्याचा सल्ला देतो. ही देखील एक रक्त तपासणीच असते. या चाचण्यांमध्ये काही समस्या आढळल्यासच पुढे ॲम्निओसेंटेसिस चाचणी करण्यास सांगितले जाते."
"गर्भवती महिलेला अनियंत्रित मधुमेह असेल, तिचे वय जास्त असेल किंवा आधीच्या चाचण्यांमध्ये बाळाला एखाद्या गंभीर आजाराचा धोका असल्याचे संकेत मिळाले असतील, तरच ॲम्निओसेंटेसिस चाचणी केली जाते."
डॉ. तपस्या स्पष्ट करतात की, "साधारण 10 वर्षांपूर्वी या चाचण्या फार कमी प्रमाणात केल्या जात होत्या. त्या प्रामुख्याने दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध होत्या आणि त्यांचा खर्चही जास्त होता."
"परंतु, आता या चाचण्या अधिक प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध असून त्यांचा खर्चही तुलनेने कमी झाला आहे."
"आता भारतात उच्च-जोखमीच्या (हाय रिस्क) गर्भधारणांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी काही महिलांना आधीच्या गर्भधारणेत अडचणी आल्या असतील, तर त्यांना बाळाच्या आरोग्याबाबत चिंता वाटत असत. अशा वेळी काही चाचण्यांसाठी परदेशात जावे लागत असत. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, या सुविधा भारतातच सहजपणे उपलब्ध होतात."
डॉ. तपस्या सांगतात की, ॲम्निओसेंटेसिस चाचणीचा खर्च सामान्यपणे 20 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान असतो. परंतु, काही रुग्णालयांमध्ये यासाठी थोडे अधिक शुल्क आकारले जाऊ शकते, तर काही ठिकाणी हा खर्च यापेक्षा कमीही असू शकतो.
या चाचणीचे काही धोके आहेत का?
एनएचएसच्या माहितीनुसार, ॲम्निओसेंटेसिस चाचणीनंतर गर्भपात होण्याचा धोका कमी असला तरी तो नाकारता येत नाही. साधारणपणे 200 गर्भधारणांपैकी एका प्रकरणात गर्भपाताचा धोका असू शकतो. तसेच जुळी किंवा त्यापेक्षा अधिक बाळं पोटात असतील, तर हा धोका तुलनेने अधिक असू शकतो.
जर एखाद्या गर्भवती महिलेला एचआयव्ही पॉझिटिव्ह, हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सीचा संसर्ग असल्यास, ॲम्निओसेंटेसिस चाचणीमुळे हा संसर्ग बाळापर्यंत पोहोचण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशी चाचणी करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञ संबंधित धोक्यांबाबत सविस्तर माहिती आणि आवश्यक सल्ला देतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. तपस्या यांच्या मते, या चाचणीत आईच्या पोटात सुई टाकून गर्भातील द्रवाचा नमुना घेतला जातो. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये गर्भपात किंवा संसर्गाचा धोका असू शकतो, हा धोका कमी प्रमाणात म्हणजे 1 टक्के इतका असू शकतो. तसेच काही महिलांना चाचणीनंतर थोड्या वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
डॉ. युक्ता सांगतात की, ही नियमितपणे केली जाणारी तपासणी किंवा चाचणी नाही. कारण या चाचणीशी गर्भपाताचा काही प्रमाणात धोका असतो. त्यामुळे ती फक्त गरज असल्यासच करण्याचा सल्ला दिला जातो.
चाचणीचे निकाल नकारात्मक आल्यावर काय केले जाते?
चाचणीच्या निकालांमधून बाळाला एखादा आजार किंवा विकार असल्याचे दिसल्यास, त्याचा बाळाच्या आरोग्य आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, याबद्दल डॉक्टर सविस्तर चर्चा करतात.
त्यानंतर महिलेला समुपदेशन आणि आवश्यक मदत दिली जाते, जेणेकरून ती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भधारणा पुढे सुरू ठेवायची की गर्भपाताद्वारे ती संपुष्टात आणायची याबाबत निर्णय घेऊ शकेल.
डॉ. तपस्या सांगतात, "चाचणीत बाळाला गंभीर आरोग्यविषयक समस्या असल्याचे आढळून आल्यास आणि त्या चा भविष्यात मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्यास, कायद्यानुसार ठराविक परिस्थितींमध्ये डॉक्टरांना 24 आठवड्यांपर्यंत गर्भपाताची शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत."
ते पुढे सांगतात, "उदाहरणार्थ, अशा प्रकरणांची माहिती पटियाला येथील राजिंद्र सरकारी वैद्यकीय संस्थेला दिली जाते. त्यानंतर तज्ज्ञांचं एक पॅनेल त्या प्रकरणाचा आढावा घेते आणि बाळाला जन्म द्यायचा की वैद्यकीय कारणांमुळे गर्भधारणा थांबवायची, याबाबत निर्णय घेतला जातो."
"पण, असा निर्णय घेताना वैद्यकीय गर्भपातासंदर्भातील कायद्यातील तरतुदी आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असते."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "जर एखाद्या महिलेला गर्भपात करायचा असेल, तर तिचे समुपदेशन केले जाते. तसेच जरा एखाद्या महिलेला या प्रक्रियेदरम्यान मानसिक तणाव जाणवत असल्यास, मानसिक आरोग्याशी संबंधित मदत आणि मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाते."
त्या स्पष्ट करतात की, "जर चाचणीत एखादा विकार आढळूनही पालकांनी गर्भधारणा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना संभाव्य परिणामांची संपूर्ण माहिती दिली जाते. त्यानंतर ही माहिती समजल्याची आणि गर्भधारणा कायम ठेवण्याची त्यांची इच्छा असल्याची लेखी नोंद घेऊन त्या कागदपत्रावर स्वाक्षरी करून घेतो."
ही चाचणी करण्यापूर्वी कोणते नियम पाळावे लागतात?
डॉ. तपस्या सांगतात, "ॲम्निओसेंटेसिस ही चाचणी पीसी-पीएनडीटी (गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र) कायद्याच्या नियमांनुसार केली जाते. या कायद्यानुसार तपासणी करता येते, पण गर्भातील बाळाचे लिंग सांगण्यास सक्त मनाई आहे. लिंगनिश्चितीसाठी या चाचणीचा गैरवापर होऊ नये, यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे लागते."
"ही चाचणी करण्याची परवानगी केवळ मान्यताप्राप्त केंद्रांनाच असते. अशा केंद्रांना रुग्णाची ओळख, पत्ता, तपासणीची शिफारस करणाऱ्या डॉक्टरांची माहिती आणि इतर आवश्यक नोंदी ठेवाव्या लागतात. त्यामुळे कोणाची तपासणी झाली आणि ती कोणत्या कारणासाठी केली, याची नोंद राहते."
"ही चाचणी अल्ट्रासाऊंड किंवा 'फेटल मेडिसिन' (गर्भाशी संबंधित वैद्यकीय शाखेतील) तज्ज्ञांकडून केली जाते. परंतु, डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय ही चाचणी करता येत नाही."
"तपासणीपूर्वी डॉक्टरांना एक फॉर्म भरून त्यात आपले नाव, नोंदणी क्रमांक आणि शिक्का नमूद करावा लागतो. डॉक्टरांची अधिकृत शिफारस नसल्यास तज्ज्ञही ही तपासणी करू शकत नाहीत."
"चाचणी करण्यापूर्वी रुग्णाची लेखी संमती घेतली जाते. अनेक ठिकाणी पती-पत्नी दोघांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या जातात. तसेच या चाचणीची प्रक्रिया काय आहे, तिचे फायदे-तोटे काय आहेत आणि काही प्रकरणांमध्ये गर्भपाताचा धोका असू शकतो, याची संपूर्ण माहिती आधीच दिली जाते."
डॉ. तपस्या सांगतात की, "ही चाचणी करण्यासाठी रुग्णाला फक्त फेटल मेडिसिनचे शिक्षण घेतलेल्या आणि प्रमाणित तज्ज्ञांकडेच पाठवले जाते."
'गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीवर प्रतिबंध) कायदा, 1994' नुसार गर्भधारणेदरम्यान बाळाचे लिंग ओळखण्यासाठी कोणतीही तपासणी करणं बेकायदेशीर आहे. या कायद्याचा उद्देश स्त्री भ्रूणहत्या रोखणं आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार शिक्षा आणि कारवाईची तरतूद आहे.
डॉ. शर्मा सांगतात, भारतात पीसीपीएनडीटी कायदा लागू आहे. त्यामुळे अल्ट्रासाऊंड असो किंवा ॲम्निओसेंटेसिस चाचणी, कोणत्याही परिस्थितीत बाळाचे लिंग सांगणे कायद्याने मनाई आहे.
त्या पुढे म्हणतात, "ॲम्निओसेंटेसिस चाचणी करताना आम्ही फक्त बाळाच्या जनुकीय रचनेची तपासणी करतो, म्हणजे त्याचे जीन्स सामान्य आहेत की नाही हे पाहतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























