सहा खासदारांचा अखेर उद्धव ठाकरेंना अधिकृतपणे 'जय महाराष्ट्र'; जाणून घ्या या खासदारांबाबत

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज सोमवारी (22 जून) अधिकृतपणे प्रवेश केला आहे.
फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज सोमवारी (22 जून) अधिकृतपणे प्रवेश केला आहे.
    • Author, दिग्विजय जिरगे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज सोमवारी (22 जून) अधिकृतपणे प्रवेश केला आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला.

या सहा खासदारांमध्ये, ओम राजेनिंबाळकर (धाराशिव), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) आणि संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई) यांचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "चार वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. त्यावेळी 40 आमदार सोबत होते. आता आम्ही सिक्सर मारलेला आहे. आगोदर 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. आपला लढा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. शिवसेनेचे विचार तिथे शिवसैनिक."

पुढे ते म्हणाले की, "आज हे सहा खासदार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे काही लोक उलट सुलट बातम्या करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की सहा खासदार ते ग्रास रुटला काम करणारे आहेत."

"आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही, तर फुल्लप्रूफ करतो. कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत ही प्रक्रिया आम्ही केलेली आहे," असंही ते म्हणाले आहेत.

व्हीपनंतरही बैठकीला गैरहजर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची गुरुवारी (18 जून) दिल्लीत संसद भवनातील पक्ष कार्यलयात बैठक पार पडली होती.

सर्व खासदारांना या बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी 17 जून रोजी व्हीप काढला होता. या बैठकीला सहा खासदार गैरहजर होते.

त्याआधी, 14 जूनला म्हणजे रविवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती.

शिवसेना

फोटो स्रोत, ANI

मात्र, या बैठकीला पाच खासदार प्रत्यक्षरित्या उपस्थित न राहता, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. तेव्हापासूनच खरंतर 'खासदार फुटी'च्या चर्चांना सुरुवात झाली.

यात यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर प्रत्यक्ष हजर नव्हते.

अखेर, या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या सहा खासदारांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1. खासदार ओम राजेनिंबाळकर (धाराशिव)

सर्वसामान्य लोकांना फोनवर 24 तास उपलब्ध असणारा नेता म्हणून ओळखले जाणारे ओम राजेनिंबाळकर सलग दुसऱ्यांदा धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. लोकांमध्ये मिसळणारा आणि उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते सर्वपरिचित आहेत.

धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील ही दोन घराणी कायम चर्चेत राहिली आहेत. सलग दोनदा त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

खासदार ओम राजेनिंबाळकर

फोटो स्रोत, Facebook/MP Omraje Nimbalkar

तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असलेले राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. काँग्रेसमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे ओम राजेनिंबाळकर यांनी नंतर स्थानिक समीकरणामुळे शिवसेनेत प्रवेश केला होता.

ओम राजेनिंबाळकर यांनी यापूर्वी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर 2014 च्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी ओम राजेनिंबाळकर यांचा पराभव केला होता.

2. खासदार नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील नागेश पाटील आष्टीकर हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर यांचा पराभव केला होता.

नागेश पाटील यांचं शिक्षण एम. कॉमपर्यंत झालेलं आहे. सरपंचपदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघाचंही (2014) नेतृत्व केलं आहे.

खासदार नागेश पाटील आष्टीकर

फोटो स्रोत, Facebook/Nagesh Bapurao Patil Ashtikar

हिंगोली लोकसभा मतदारसंघात हदगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेचे ते जुने कार्यकर्ते आहेत. ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचेही संचालक आहेत.

शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघातून तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी दिली होती.

3. खासदार संजय जाधव (परभणी)

बंडू जाधव या नावाने परिचित असणारे संजय हरीभाऊ जाधव हे परभणी लोकसभा मतदारसंघाचे मागील तीन टर्मपासून प्रतिनिधित्व करतात. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपनेते असलेले संजय जाधव यांची निष्ठावंत अशी ओळख होती.

वर्धापन दिनाच्या पोस्टरवरुन मशाल चिन्ह गायब

फोटो स्रोत, Facebook/Sanjay Jadhav

फोटो कॅप्शन, वर्धापन दिनाच्या पोस्टरवरुन मशाल चिन्ह गायब (संजय जाधव यांच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनग्रॅब)

2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांनी परभणी मतदारसंघातून महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) यांचा पराभव केला होता.

खासदार संजय जाधव

फोटो स्रोत, Facebook/Sanjay Jadhav

तत्पूर्वी, ते 2004 आणि 2009 मध्ये परभणी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. शिवसेना पक्षात ज्यावेळी फूट पडली तेव्हा संजय जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले होते.

4. खासदार संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम)

संजय उत्तमराव देशमुख हे 2024 पासून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात.

याआधी ते दिग्रस मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. 2008 पासून ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही संचालक आहेत.

 खासदार संजय देशमुख

फोटो स्रोत, Facebook/Sanjay Uttamrao Deshmukh

बी. कॉम पदवीधर असलेले संजय देशमुख हे साधारणपणे 90 च्या दशकात शिवसेनेशी जोडले गेले होते. ते 1999 आणि 2004 असे सलग दोन वेळा दिग्रस मतदारसंघातून विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. 2001 ते 2004 या काळात ते राज्याचे क्रीडामंत्रीही होते.

यवतमाळ-वाशिम हा विदर्भातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. 2024 ची या मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या मतदारसंघावर गेल्या पाच टर्मपासून शिवसेनेच्या भावना गवळी यांचं एकहाती वर्चस्व होतं.

परंतु, शिवसेना शिंदे गटाने त्यांना उमेदवारी न देता तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (महाल्ले) यांना उमेदवारी दिली होती. देशमुख यांनी पाटील यांचा पराभव केला होता.

5. खासदार भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

निवृत्त सरकारी अधिकारी असलेले भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे शिर्डी मतदारसंघाचं नेतृत्व करतात. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिंदेसेनेचे तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला होता. लोखंडे यांच्याबाबत मतदारसंघात मोठी नाराजी होती. त्याचा फायदा वाकचौरे यांना झाला होता, असं सांगितलं जातं.

भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेकवेळा पक्षांतर केल्याचे दिसून येते. कधी शिवसेना, कधी काँग्रेस, तर कधी भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे

फोटो स्रोत, Facebook/Bhausaheb Rajaram Wakchaure

वाकचौरे यांनी यापूर्वी 2009 मध्येही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला होता. आपल्या पहिल्याच निवडणुकीत आठवले यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत केल्यामुळे वाकचौरे यांच्या नावाची राज्यात मोठी चर्चा झाली होती.

परंतु, 2014 मध्ये त्यांनी वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली. परंतु, त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी पराभव केला होता.

पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. श्रीरामपूर विधानसभा निवडणूकही लढवली, मात्र तेथेही त्यांना अपयश आले. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं.

6. खासदार संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)

राजकीय पार्श्वभूमी लाभलेले संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. त्यांचे वडील दिना पाटील हे मोठे नेते होते.

त्यांनीही विधानसभेत अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केलं होतं. संजय पाटील यांच्या आई मनोरमा पाटील याही मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षे नगरसेविका होत्या.

खासदार संजय दिना पाटील

फोटो स्रोत, Facebook/Sanjay Dina Patil

2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय पाटील हे निवडणुकीला उभे होते. त्यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. तत्पूर्वी त्यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहत त्यावेळचे भाजपचे उमेदवार किरीट सोमय्या यांचा पराभव केला होता.

त्याआधी 2004 मध्ये ते राष्ट्रवादीच्याच तिकीटावर भांडूप विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि संजय पाटील यांच्यातील वाद ही मोठा चर्चेचा विषय ठरला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)