You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानात ट्रेनला लक्ष्य करून केलेल्या स्फोटात किमान 20 जणांचा मृत्यू
- Author, ॲलेक्स फिलिप्स आणि मोहम्मद काझिम, क्वेटा
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
पाकिस्तानात एका स्फोटात किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 70 जण जखमी झाले आहेत. लष्करी जवानांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रेनला लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला होता.
ही ट्रेन क्वेटामधील चमन फाटक रेल्वे स्टेशनमधून जात असताना रविवारी (24 मे) सकाळी हा स्फोट झाला. क्वेटा ही बलुचिस्तान प्रांताची राजधानी आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, या स्फोटामुळे रेल्वेचे तीन डबे आणि इंजिन रुळावरून घसरले. तर 2 डबे उलटले आहेत. ही ट्रेन म्हणजे शटल सेवा प्रामुख्यानं ईदसाठी घरी परतणाऱ्या लष्करी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जात होती.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या फुटीरतावादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी म्हटलं आहे की हा एक आत्मघातकी बॉम्बस्फोट होता. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या माहितीला दुजोरा दिलेला नाही.
स्फोट कसा झाला आणि किती नुकसान झालं?
घटनास्थळावरून आलेल्या दृश्यांमध्ये रेल्वेच्या डब्यांचे आणि बाजूला असलेल्या कारचे नुकसान झालेले दिसत आहे.
या बॉम्बस्फोटामुळे जवळच्याच एका इमारतीचं देखील नुकसान झाल्याचं दिसतं आहे.
"हा स्फोट झाला तेव्हा ट्रेन सुरू होती आणि त्यात प्रवासीदेखील होते," असं नासीर अहमद या स्थानिक रहिवाशानं बीबीसीला सांगितलं.
ते म्हणाले की ही रविवारची सकाळ असल्यामुळे हा स्फोट झाला तेव्हा त्याचं कुटुंब झोपलेलं होतं. या स्फोटामुळे त्यांच्या घरातील सर्व खिडक्यांच्या काचा फुटल्या.
या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की एक स्फोटकांनी भरलेलं एक वाहन येऊन ट्रेनवर आदळलं. त्यातून हा स्फोट झाला.
या स्फोटात 20 जण मारले गेले आहेत अशी माहिती बलुचिस्तानमधील एका पोलीस अधिकाऱ्यानं आणि एका नागरी अधिकाऱ्यानं बीबीसीला दिली. तसंच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की मृतांमध्ये 3 सैनिकांचा समावेश आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून तीव्र निषेध
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले आहेत, "अशा भ्याड दहशतवादी कृत्यांमुळे पाकिस्तानच्या जनतेचा निर्धार कमकुवत होणार नाही."
"या दु:खद प्रसंगी संपूर्ण देश बलुचिस्तानच्या लोकांच्या पाठीशी एकजुटीनं उभा आहे," असं ते पुढे म्हणाले.
या हल्ल्यातील जखमींवर उपचार होत असलेल्या रुग्णालयात आपातकालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे.
या ट्रेनमधून प्रवास करत असलेले प्रवासी, जवळच्याच एका लष्करी छावणीतून क्वेटाच्या मुख्य रेल्वे स्टेशनकडे चालले होते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिथून ते पेशावरला आणि त्यानंतर सुट्ट्यांसाठी त्यांच्या गावी जाणार होते.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून वारंवार हल्ले
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)कडून बलुचिस्तानमध्ये रेल्वेला लक्ष्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या 2 वर्षांमध्ये, या सशस्त्र गटानं 'जाफर एक्सप्रेस'वर अनेकदा हल्ले केले आहेत.
मार्च 2025 मध्ये कट्टरतावाद्यांनी पेशावरच्या मार्गावर असलेल्या एका ट्रेनचं अपहरण केलं होतं आणि अनेक प्रवाशांना ओलीस ठेवलं होतं.
पाकिस्तानचं केंद्रीय सरकार, स्थानिक जनतेला कोणताही फायदा न देता देशातील सर्वात मोठ्या प्रांतातील समृद्ध खनिज संपत्तीचा वापर करत असल्याचा बीएलएचा आरोप आहे.
संघर्षग्रस्त बलुचिस्तान
क्षेत्रफळाचा विचार करता, पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी जवळपास 44 टक्के भूभाग बलुचिस्ताननं व्यापलेला आहे. या प्रांताच्या सीमा इराण आणि अफगाणिस्तानला भिडलेल्या असून त्या तणावग्रस्त असतात.
तसंच पाकिस्तानातील अरबी समुद्राच्या किनारपट्टीचा काही प्रदेशदेखील या प्रांतात आहे. पाकिस्तानच्या 24 कोटींहून अधिक लोकसंख्येपैकी जवळपास 5 टक्के लोक या प्रांतात राहतात.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला क्वेटा शहरात आणि संपूर्ण प्रदेशात बीएलएचे सशस्त्र सैनिक आणि पाकिस्तानची सुरक्षा दलं यांच्यामध्ये हिंसक संघर्ष उफाळला होता. या संघर्षात 31 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.