You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात 'इथे' रेड अलर्ट, विदर्भात उष्णता वाढली; पुढील काही दिवसांचा 'असा' आहे हवामान अंदाज
महाराष्ट्रात एकीकडे उन्हाच्या झळा आणि दुसरीकडे मान्सूनपूर्व वादळी पाऊस असं हवामान गेल्या 24 तासांत पाहायला मिळलं. कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला. पण विदर्भात मात्र उष्णतेची तीव्र लाट आली असून काही जिल्ह्यांत तर रेड अलर्ट दिला आहे.
पुढचे पाच-सहा दिवस उष्णता कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
24 मे रोजी दुपारपर्यंत भारताच्या इन्स्टॅट 3DR उपग्रहानं टिपलेल्या या दृश्यांमध्ये महराष्ट्रात किनारी भागात अनेक ठिकाणी ढग जमलेले दिसतात. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
वाऱ्यांची दिशा पाहिली, तर दक्षिण भारतात किनारी भागात समुद्रावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. या वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह वादळी वारे तसंच मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.
पण मध्य भारतात राजस्थानकडून येणारे कोरडे वारे वाहतायत. याच वाऱ्यांमुळे विदर्भातल्या उष्णतेत भर पडताना दिसते आहे.
नेमकी किती उष्णता आहे? याचा अंदाज तापमान पाहिल्यावर येईल. विदर्भात दोन दिवस जवळपास सगळीकडेच पारा 40 अंशांवर गेला होता. पारा चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरीमध्ये शनिवारी 23 मे रोजी 47.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
पुढचे काही दिवसही विदर्भात तापमान वरच राहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान 42 ते 45 अंशांवर तर मराठवाड्यात 40 अंशांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
चिंतेची बाब म्हणजे इथे रात्रीचं किमान तापमानही 30 ते 32 अंशांच्या आसपास म्हणजे बरंच वर राहील. रात्रीची अशी उष्णता जास्त घातक ठरू शकते कारण त्यामुळे शरीराला थंड होण्यासाठी वेळच मिळत नाही.
त्यामुळेच उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांत 24 मेच्या रात्रीसाठी रेड अलर्ट दिला आहे तर अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.
24 मे रोजी कोकणातील पालघर वगळता इतर सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागांत वादळी पावसाची शक्यता आहे.
तर 25 मे रोजीही अमरावती, वर्धा, चंद्रपूर इथे उष्णतेची लाट आणि रात्रीच्या उष्णतेसाठी रेड अलर्ट आहे. आणि अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट. 25 मे रोजी पुण्याचा पठारी भाग तसंच अहिल्यानगर, बीड, सोलापूर, लातूर, धाराशीव इथे वादळी वारे आणि पावसासाठी यलो अलर्ट दिला आहे.
आता इतकं उकडतंय, तर मग मान्सून कधी येईल याची तुम्हीही आतुरतेनं वाट पाहात असाल, तर नैऋत्य मोसमी वारे अजून भारताच्या मुख्य भूमीपर्यंत पोहोचलेले नाहीत. मान्सूननं शनिवारी श्रीलंकेचा बराचसा भाग व्यापला असून पुढच्या तीनचार दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
पुढच्या चार आठवड्यांसाठीचा अंदाज
भारतीय हवामान विभाग दर गुरुवारी पुढच्या चार आठवड्यांसाठीचा विस्तारीत अंदाज म्हणजे एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट जारी करतो.
21 मे रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार विदर्भात 21 ते 28 मे या पहिल्या आठवड्यात आठवड्यात काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता जाणवेल.
पण त्यानंतरच्या आठवड्यांत राज्यातलं कमाल तापमान हळूहळू कमी होत जाईल अशी अपेक्षा आहे.
पण कमाल तापमानात घट झाली, तरी राज्यातलं रात्रीचं किमान तापमान जूनच्या मध्यापर्यंत थोडं वर राहू शकतं.
दिलासा देणारी बाब म्हणजे याच काळात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.
पुढच्या चार आठवड्यांसाठी किमान तापमानाचा अंदाज
दक्षिण भारताकडून मान्सून वर सरकत जाईल तशी राज्यातलं पावसाचं प्रमाणही वाढत जाईल.
21 ते 28 मे या पहिल्या आठवड्यात राज्याच्या पश्चिम किनारी प्रदेशात पावसाला सुरुवात होताना दिसते आहे. दुसऱ्या आठवड्यापर्यंत या परिसरात मान्सूनचं आमगन आणि नियमित पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सरासरीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण पाहिलं, तर तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे 11 जूनपर्यंत बहुतांश राज्यात पाऊस हजेरी लावेल. पण त्यानंतरच्या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
भारतीय हवामान विभाग तसंच जगभरातल्या फोरकास्टिंग मॉडेल्सनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यांमध्ये मासिक सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, असं भाकीत युकेच्या रेडिंग विद्यापीठातले वातावरण आणि हवामानाचे संशोधक अक्षय देवरस यांनी वर्तवलं आहे.
यंदा मान्सूनच्या कालावधीतच एल निनो सक्रीय होण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागरातल्या या प्रवाहाचा भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होऊ शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.